जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवतीचा पाठलाग करून छेड काढणार्याला बदडल्यानंतर शहरातील समतानगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी धाव घेत वातावरण नियंत्रणात आणले.
शहरातील एका तरूणीची सय्यद अकबर सय्यद सलाउद्दीन (वय २२, रा. वंजारी टेकडी, समतानगर) हा सातत्याने छेड काढत होता. या संदर्भात तरूणीने रामानंद नगर पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे. मात्र त्याने काल सायंकाळी पुन्हा एकदा तिचा पाठलाग करून छेड काढली. यामुळे त्याला तिघांनी बदडले. ही माहिती मिळताच दोन गट आमने-सामने आले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्मित झाले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण आटोक्यात आणले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.