जळगाव प्रतिनिधी । एटीएममध्ये होत असलेल्या चोरींच्या पार्श्वभूमिवर आज सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी सर्व बँकांच्या अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत.

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी एटीएच चोरीच्या घटना घडल्या आहेत. काही एटीएममध्ये सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे हे प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमिवर, आज सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी जिल्हापेठ पोलीस स्थानकात सर्व बँकांच्या अधिकार्यांची बैठक घेतली. यात त्यांनी एटीएमसाठी सुरक्षारक्षक, सीसीटिव्ही कॅमेरे आदी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यात शक्य झाल्यास प्रत्येक एटीएममध्ये अलार्मची व्यवस्था देखील असावी. यासोबत प्रत्येक ठिकाणी रात्री तरी सुरक्षा रक्षक असावेत असे ते म्हणाले. या निर्देशांचे पालन केल्यास एटीएम चोरींसारख्या घटनांना आळा घालता येईल असे कुमार चिंथा याप्रसंगी म्हणाले.
दरम्यान, याच बैठकीत सर्व बँकांच्या अधिकार्यांना कुमार चिंथा यांनी आश्वस्त करत कुठेही आपत्कालीन स्थिती आल्यास पोलीस प्रशासन तुमच्या मदतीला असल्याची ग्वाही दिली. यासाठी त्यांनी पोलीस स्थानक आणि अधिकार्यांचे क्रमांक बँकेच्या अधिकार्यांना दिलेत. तसेच पोलीसांतर्फे रात्री नियमीतपणे गस्त घालण्यात येत असल्याचेही सांगितले. पोलीस प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील चिंथा यांनी केले.