जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासन आपल्या दारी कार्यक्रमाबाबत अफवा पसरवण्याच्या हेतून समाजमाध्यमात बदनामी करण्याचा ठपका ठेवत शिंदे गटाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांचा रेशन दुकानाचा परवाना निलंबीत करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काल जळगावात शासन आपल्या दारी उपक्रमाच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रत्येक रेशनधारकाला उपस्थितीसाठी सक्ती करण्यात आल्याची अफवा सोशल मीडियात पसरली होती. यावरून विरोधकांनी मोठ्या प्रमाणात आरोप करत सरकारला पेचात पकडले होते. तर सोशल मीडियासह मुद्रीत माध्यमातही याचे पडसाद उमटले होते. जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता आणि शिवाजीनगर परिसरातील नगरसेविका गायत्री शिंदे यांनी देखील तक्रारी केल्या होत्या.
या अनुषंगाने, जिल्हा प्रशासनाने चौकशी केली असता नगरसेवक तथा वॉर्ड क्रमांक-९ मधील रेशन धान्य दुकानाचे परवानाधारक नवनाथ दारकुंडे हे दोषी आढळून आले आहेत. त्यांनी अनेक व्हाटसऍप ग्रुपमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाला प्रत्येक रेशनकार्ड धारकाने उपस्थित राहणे बंधनकारक असून जे उपस्थित राहणार नाहीत त्यांचे धान्य तीन ते चार महिने बंद करण्यात येईल असा इशारा देणारे मॅसेज अनेक व्हाटसअप ग्रुपमध्ये शेअर केले होते. या बाबी प्रशासनाला चौकशीतून आढळून आल्या.
दरम्यान, या आधीच वॉर्ड क्रमांक-९ मधील स्वस्त धान्य दुकानाबाबत अनेक तक्रारी आढळून आल्या होत्या. यात रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा आरोप देखील करण्यात आला होता. या बाबींची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी नवनाथ विश्वनाथ दारकुंडे यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबीत केला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत.
नवनाथ दारकुंडे हे भारतीय जनता पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मार्च २०२० मध्ये झालेल्या सत्तांतरात त्यांची महत्वाची भूमिका होती. ते भाजपमधून शिवसेनेत दाखल झाले होते. तर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ते शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले होते. आज ते सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असून त्यांच्यावर या स्वरूपाची कारवाई झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे.