जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे गुरुवारी २२ जानेवारी रोजी रात्री एका तरुणाची किरकोळ वादातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुना मारुती मंदिर परिसरात रात्री ९ वाजेच्या सुमारास झालेल्या या राड्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून, सागर अरुण बिऱ्हाडे (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे गावातील जुना मारुती मंदिर परिसरात गुरुवारी रात्री सागर बिऱ्हाडे आणि एका संशयित तरुणामध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर पाहता पाहता हाणामारीत झाले. संतापाच्या भरात संशयित आरोपीने सागरला जोरात ढकलले. या झटापटीत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात सागरला पाहून संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सागरला तातडीने गावातील डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला ‘मृत’ घोषित केले.
जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत सागरच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे बिऱ्हाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



