जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेत तहसीलदारांना निवेदन सादर केले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, विशेषतः गृहिणींच्या अडचणी वाढल्या असून दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आज दिलेल्या निवेदनात केंद्र सरकारवर वारंवार गॅस दर वाढविल्याचा आरोप करण्यात आला. आतापर्यंत सुमारे ५० वेळा गॅस दरवाढ करण्यात आली असून काँग्रेस सरकारच्या काळात ४२० रुपयांना मिळणारा सिलेंडर आता ९२० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे नमूद करण्यात आले. या वाढीमुळे घरगुती बजेट कोलमडले असून सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, केवळ दरवाढच नव्हे तर गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबतही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने छोटे व्यावसायिक त्रस्त आहेत, तर घरगुती सिलेंडरचा पुरवठा देखील अनियमित होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या संपूर्ण परिस्थितीमुळे जनतेत असंतोष वाढत असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारने तातडीने गॅस दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले.
निवेदन देताना तालुका अध्यक्ष मनोज दिगंबर चौधरी, सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, उपाध्यक्ष रवी सोनवणे, सोशल मीडिया प्रमुख गणेश भालेराव, अब्दुल हक देशमुख, नितीन चौधरी, प्रतिभा सोनवणे, विशाल सपकाळे, दिलीप घोलप, कैलास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला.



