जळगाव ग्रामीणमध्ये भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’ : भगवान महाजन यांचा प्रवेश !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एरंडोलमधून तगडे आव्हान उभे करणारे भगवान महाजन यांनी मुंबईत आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्याने जळगाव ग्रामीणमधील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भगवान महाजन हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. अगदी साधारण परिस्थितीतील महाजन यांनी अतिशय परिश्रमपूर्वक कंत्राटदारीत मोठे यश मिळवले आहे. यातच त्यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत थेट एरंडोल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत उडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. या निवडणुकीत त्यांना अपयश आले असले तरी त्यांनी तब्बल ४० हजार मते घेऊन सर्वांना चकीत केले होते. या निवडणुकीनंतर त्यांची पुढील राजकीय दिशा नेमकी काय असणार याबाबत चर्चा सुरू असतांनाच ते भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या माहितीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

भगवान महाजन यांनी मंगळवारी सायंकाळी मुंबई येथे आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजनन, पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे महामंत्री विजय चौधरी, आमदार मंगेश चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांनी भगवान महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार भगवान महाजन हे जळगाव ग्रामीणमध्येच पुढील वाटचाल करण्याची शक्यता आहे. तर पुढील काळात एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात देखील ते वाटचाल करू शकतात. येथे भारतीय जनता पक्षात पोकळी असल्याने पक्ष त्यांना ताकद देण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

भगवान महाजन यांच्याकडे प्रचंड मोठी अशी आर्थिक शक्ती असून सोबत समाजाची ताकद देखील आहे. यामुळे ते भारतीय जनता पक्षात आल्यामुळे जळगाव ग्रामीणमध्ये पक्ष मजबूत होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. यात ते नगरपालिकेची निवड करतात की जिल्हा परिषदेची ? याबाबत आता मोठ्या उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले आहे. तथापि, भगवान महाजन यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला एक मोठा व सक्षम चेहरा मिळणार असून याचा जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आगामी राजकारणावर नेमका काय परिणाम होईल ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अर्थात, जळगाव ग्रामीणमध्ये भाजपने ‘मास्टरस्ट्रोक’ लगावल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

Protected Content