विद्यापीठातील प्रभारी परीक्षा संचालकांचा राजीनामा

जळगाव प्रतिनिधी | जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा संचालक प्रा. के. एफ. पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सध्या प्रभारीराज सुरू आहे. कुलगुरूंसह विविध महत्वाच्या पदांवर मान्यवरांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आता प्रभारी अधिकार्‍यांनी राजीनामा देण्याचे जणू काही सत्रच सुरू झाल्याचेही आता दिसून येत आहे. यातच आता विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. के. एफ. पवार यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा प्रभारी कुलगुरूंना सोपविला आहे. ३० जून रोजी त्यांच्याकडे परीक्षा संचालकपदाचा प्रभार आला होता. आपल्याकडील अन्य अतिरिक्त जबाबदार्‍या असल्याने त्याकामास पुरेसा वेळ दिला जात नसल्यामुळे आपण स्वयंस्फूर्तीने राजीनामा दिला असल्याची माहिती परीक्षा संचालक प्रा. के.एफ.पवार यांनी दिली आहे.

२१ डिसेंबर पासून विद्यापीठातील ऑनलाईन परिक्षांना प्रारंभ होत असतांनाच प्रभारी परीक्षा संचालकांनी राजीनामा दिल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनाची तारांबळ उडण्याचे संकेत आहेत. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत प्र.कुलगुरूंसह कुलसचिव, लेखाधिकारी यांनी राजीनाामे दिल्याने नव्याने या पदावर प्रभारी नेमण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. नियुक्तीनंतर काही अवधीतच नियुक्त पदाधिकारी राजीनामा देत असल्याने याबाबत एकच चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content