जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांच्या कुटुंबियांना सीआरपीएफचे संरक्षण प्रदान करण्यात आले असून चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे यांच्या घरी जवान पहारा देत असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांपैकी काहींच्या कार्यालयांमध्ये तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे या आमदारांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर आता या बंडखोर आमदारांपैकी जवळपास १६ आमदारांना केंद्र सरकराने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या जळगावातील निवासस्थानी आज सायंकाळी सीआरपीएफचे सशस्त्र जवान दाखल झाले आहेत. हे जवान आता आमदार सोनवणे यांच्या निवासस्थानी पहारा देत असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी पाटील, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयांमध्ये तोडफोडीच्या घडना समोर आल्या होत्या. त्यामुळे बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या अनुषंगाने लताताई सोनवणे यांच्या कुटुंबियांना सुरक्षा मिळालेली आहे.