जळगाव प्रतिनिधी | भाजपमधील बंडखोर नगरसेवक मध्यंतरी पुन्हा भाजप सोबत गेले होते. यातील काही जण परत येण्याची शक्यता असतांना मात्र असे घडले नाही. यामुळे महापालिकेतील फोडाफोडीचे राजकारण पुन्हा एका नव्या पातळीवर पोहचल्याचे दिसून आले आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीत भाजपमध्ये उभी फूट पडल्याने शिवसेनेच्या महापौर तर बंडखोर गटाचे उपमहापौर असे समीकरण अस्तित्वात आले. मात्र सहा महिने होत नाही तोच सत्ताधार्यांमध्ये धुसफुस सुरू झाली. याचमुळे १२ नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केली. परिणामी महापालिकेत शिवसेना पक्ष अल्पमतात आला असून याचा सरळ फटका हा विकासकामांच्या मंजुरीला पडणार आहे.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी भाजपमध्ये गेलेले काही नगरसेवक पुन्हा परतण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा समोर आली. यासाठी शहरातील एका हॉटेलमध्ये संबंधीतांसोबत चर्चा देखील करण्यात आली. मात्र तिघांनी ऐन वेळेस नकार दिल्यामुळे हा सर्व प्रकार फिसकटला. अर्थात, महापालिकेत आता फोडाफोडीला वेग आल्याचे दिसून येत आहे.