नवीदिल्ली, विशेष प्रतिनिधी | आय.डब्ल्यू.एस. वॉटर कलर सोसायटीतर्फे सोसायटीचे भारतातील प्रमुख अमित कपूर यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून (दि.८) येथे पहिल्या ‘ऑलिंपीक आर्ट-२०१९’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येथील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट येथे ११ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात ३९ देशांचे वॉटर कलरमध्ये काम करणारे चित्रकारही सहभागी होणार आहेत. त्यात जळगाव येथील चित्रकार सचिन मुसळे यांचाही समावेश आहे.
श्री.मुसळे यांनी या आधीही पेनिसिलव्हेनिया, अलबेनिया येथील आंतराष्ट्रीय चित्र प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला असून पारितोषिकेही मिळवली आहेत. याशिवाय आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट ग्यालरी येथे ग्रुप-शो व नेहरू सेंटर मुंबई येथील चातक फेस्टिव्हलमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. देशातील नामांकित अशा मसुरी येथील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या लाल बहादूर शास्त्री अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी वॉटर कलर्सचे वर्क शॉप घेण्याची संधीही त्यांना या आधी मिळाली आहे.