जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पर्सनल लोन व क्रेडिटकार्ड लोन देत असल्याचे सांगून अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील तरुणाची तब्बल ७ लाख ६० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगाव सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद प्रकाश पाटील (वय-२३) रा. मंगरूळ ता. अमळनेर जि. जळगाव हल्ली मुक्काम हिंजेवाडी, पुणे) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १८ ते १९ जानेवारी रोजी त्याला एका अनोळखी नंबर वरून फोन आला. त्यात पर्सनल लोन व क्रेडिटकार्ड लोन देत असल्याचे बतावणी केली तसेच तरुणाचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबरच्या आधारे तरुणाच्या नावाने आलेले लोनची रक्कम आणि त्याच्या खात्यातील रक्कम अशी एकूण ७ लाख ६० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
हा प्रकार घडल्यानंतर तरुणाने शुक्रवारी २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात अनोळखी नंबर धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.