जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी कार्यालयात एकाने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला.

या संदर्भातील वृत्त असे की, कजगाव येतील भूषण नामदेव पाटील या तरूणाने आज सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

भूषण पाटील हा कजगाव येथील रहिवासी असून गावातील बस स्टँड समोर असलेल्या गावठाण गट क्रमांक १३१ समोरचे अतिक्रमण काढण्यासाठी तो पाठपुरावा करत आहे. या संदर्भात त्याने अनेकदा निवेदने देऊन देखील स्थानिक ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केली नाही. या संदर्भात कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा भूषण पाटील याने दिलेला होता.

या अनुषंगाने आज सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास भूषण नामदेव पाटील याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वत:च्या अंगावर पेट्रोलच्या कॅनमधून पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने दिलेल्या इशार्‍यामुळे पोलीस प्रशासन सतर्क होते. या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Protected Content