जळगाव प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील २५ कोटी रूपयांच्या रखडलेल्या पाणी पुरवठा योजनाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने अलीकडेच मंजुरी मिळाली होती. यानंतर संबंधीत योजनेचा कार्यादेश अर्थात वर्क ऑर्डर आज वरणगावच्या मुख्याधिकार्यांना प्रदान करण्यात आली आहे. परिणामी ही योजना लागलीच सुरू होणार असून वरणगावकरांची तहान लवकरच भागणार आहे.
याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील २५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती राज्यसरकारने ६ जानेवारी रोजी उठवली होती. यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेले प्रयत्न निर्णायक ठरले होते.
आधीच्या युती सरकारच्या काळात ही २५ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली परंतु सरकार बदलानंतर सर्वच योजनाना स्थगिती देण्यात आली होती. या पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवा असल्याने या योजनेला मान्यता मिळावी यासाठी नामदार गुलाबराव पाटील यांनी विशेष प्रयत्न करून पाठपुरावा केला होता याचे फलित म्हणून आज या योजनेवरील स्थगिती उठवण्यात आली आहे.
दरम्यान, ६ जानेवारी रोजीच सुधारित सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास कार्यादेश देण्याचे व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास ती पूर्ण करून कार्यादेश देण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश नगर विकास विभागाचे सहसचिव पां.जो. जाधव यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते.
या अनुषंगाने आज वरणगावच्या पाणी पुरवठा योजनेची वर्कऑर्डर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते
वरणगावचे मुख्याधिकारी शाम गोसावी यांना प्रदान करण्यात आली. याप्रसंगी पाणी पुरवठा अभियंता गणेश चाटे, कंत्राटदार अमित जैन व सचिन जैन यांची उपस्थिती होती. या योजनेचे काम लागलीच सुरू करण्यात येणार असल्याने वरणगावकरांच्या कधीपासूनच्या प्रलंबीत समस्येचे निराकरण होणार आहे.
या पाणीपुरवठा योजनेत ला मिळालेली स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने ही योजना मंजूर करण्यात आली असून यामुळे वरणगावकर यांची तहान भागणार आहे.