जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणार्या चिंचोली येथील मेडीकल हबच्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून आज डीएमईआरच्या सहसंचालकांनी अधिष्ठात्यांसह याची पाहणी केली. लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने जळगावात मेडिकल कॉलेज मंजूर होऊन कार्यरत झाले आहे. यासोबत २०१७ साली तालुक्यातील चिंचोली येथे वैद्यकीय शिक्षणाचे हब मंजूर झाले आहे. मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात हा प्रोजेक्ट थंड बस्त्यामध्ये पडला होता. तर आता सत्तांतर झाल्यानंतर ना. गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याने या कामाला पुन्हा एकदा गती आल्याचे दिसून येत आहे.
या नियोजीत मेडिकल हबची सविस्तर पाहणी चिंचोली येथे जाऊन मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे अधिकारी यांच्यासह सर्व अधिष्ठाता, कर्मचारी यांनी केली. मेडिकल हबचे काम पुढील टप्प्यात लवकरच सुरू करण्यात येईल. याबाबतचे नियोजन दिवसभरात करण्यात आले.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉक्टर अजय चंदनवाले, आंतरराष्ट्रीय वित्तीय कंपनीचे बालसुब्रमण्यम राममूर्ती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठात्या डॉ. तबस्सुम पानसरे, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश महाजन, वैद्यकीय शिक्षण व संशोधन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिनिधी अरविंद देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी.पी. बिर्हाडे, चिंचोली गावाचे तलाठी सुधाकर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, या माध्यमातून ना. गिरीश महाजन यांच्या ड्रीम प्रोजेक्टला लवकरच शुभारंभ होणार असल्याचेही अधोरेखीत झाले आहे.