Home Cities जळगाव तृतीयपंथीस स्त्री राखीव प्रवर्गातून उमेदवारी : कोर्टाचा निर्णय

तृतीयपंथीस स्त्री राखीव प्रवर्गातून उमेदवारी : कोर्टाचा निर्णय

0
27

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत एका तृतीयपंथी उमेदवाराला स्त्री राखीव या वर्गवारीतून निवडणूक लढविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली आहे.

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायतीसाठी अंजली गुरू संजना जान या तृतीयपंथीने महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधिताची स्त्री प्रवर्गासाठी राखीव वॉर्डातून निवडणूक लढवण्याची मागणी फेटाळली होती. यावरून तहसील कार्यालयात बराच काळ वाद देखील झाला होता.

दरम्यान, अंजली गुरू संजना जान यांचा अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी फेटाळून लावल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यांच्यातर्फे अ‍ॅड.आनंद भंडारी यांनी युक्तीवाद सादर केला. यात तृतीयपंथी व्यक्ती अधिकार संरक्षण कायदा २०१९ नुसार लिंग निवडण्याचा अधिकार तृतीयपंथी व्यक्तीस आहे. याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले. या अनुषंगाने खंडपीठाचे न्या.रवींद्र घुगे यांनी अंजली गुरू यांचा निवडणूक अर्ज स्त्री प्रवर्गातून मान्य केला. मात्र, त्यांना भविष्यात पुरुष म्हणून सवलत घेता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. यामुळे अंजली गुरू संजना जान यांना आता महिला राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविता येणार आहे.


Protected Content

Play sound