जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषद सदस्या सौ. पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केलेल्या तक्रारीनुसार गौण खनिज घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेतर्फे होत असली तरी माहिती मिळण्यात अडथळा येत असल्याने ही चौकशी संथ गतीने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने केलेल्या विविध कामांत गौण खनिजाबाबत आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली आहे. जलयुक्त शिवार आणि अन्य कामांसाठी गौणखनिज वापरताना ठेकेदार व अधिकार्यांनी संगनमताने बोगस पावत्या जोडल्या. यासंर्दभात सदस्या सावकारे यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. त्यांनी घेतलेल्या सुनावणीत जिल्हा जलसंधारण अधिकार्यांनी आर्थिक घोटाळा झाल्याचे मान्य केले होते.
यावर जिल्हाधिकार्यांनी जि.प. सीईओंना पत्र देवून कारवाईच्या सूचना केल्या होत्या. पण, कारवाई कारवाई होत नसल्याने सावकारे यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशीची मागणी केली. त्यानुसार सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून माहिती घेतली जात आहे. मात्र याला विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी संबंधीत विभाग माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत असल्यानेच विलंब होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.