गाळेधारक उद्यापासून जाणार बेमुदत संपावर !

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे महापालिका प्रशासनाने गाळे भाडे वसुलीसाठी अल्टीमेटम दिला असतांना शहरातील व्यापार्‍यांनी ही अवाजवी बिले भरता येणार नसल्याचे सांगत शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे याबाबतची माहिती दिली.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

महापालिका प्रशासनाने व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांना थकीत रकमा भरण्यासाठी सोमवारची मुदत दिली आहे. थकबाकी न भरल्यास गाळे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केले. या प्रसंगी गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्यासह पांडुरंग काळे, राजस कोतवाल, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, विलास सांगोरे, राजेश पिंगळे, रिजवान जहागीरदार उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. शांताराम सोनवणे म्हणाले की, राज्यातील २७ महापालिका क्षेत्रात गाळ्यांचा प्रश्‍न असतांना फक्त परंतु जळगावच्या महापालिकेची अतिशय ताठर भूमिका आहे.

याप्रसंगी त्यांनी आमदारांवरही टीका केली. ते म्हणाले की, आमदार राजूमामा भोळे यांनी निवडणूक जवळ आली की गाळेधारकांना आश्‍वासन दिले होते. परंतु दोन निवडणुका होऊनही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. प्रशासन गाळेधारकांचा कोणताही विचार करत नसल्याने चौबे मार्केट, भोईटे मार्केट, जुने बी.जे.मार्केट, डॉ. आंबेडकर मार्केट, वालेचा मार्केट, छत्रपती शाहु महाराज मार्केट, शिवाजीनगर मार्केट, भास्कर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, निर्मलाबाई लाठी शाळा इमारत, शामा प्रसाद मुखर्जी मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, जुने शाहु मार्केट, धर्मशाळा मार्केट, गेंदालाल मिल कॉम्प्लेक्स या चौदा मार्केटमधील गाळेधारक शुक्रवारपासून बेमुदत दुकाने बंद ठेवणार आहेत. गरज भासल्यास कुटुंबियांसह रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. कोरोना काळात काही विपरीत घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला आहे.

Protected Content