जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून फरार असणारा सराईत गुन्हेगार राकेश चंद्रकांत साळुंखे उर्फ लिंबू राक्या याला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
राकेश चंद्रकांत साळुंके उर्फ लिंबू राक्या (वय २४, रा. कांचननगर, जैनाबाद) याच्या विरुद्ध प्राणघातक हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे शहरातील जिल्हापेठ, शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तो मे २०२० पासून फरार होता.
मंगळवारी रात्री आठच्या सुमारास लिंबू राक्या हा पिस्तुलसह लोकांना धमकावत असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांनी विजय पाटील, नंदलाल पाटील व भगवान पाटील, सचिन महाजन या कर्मचार्यांना बहिणाबाई उद्यान परिसरात पाठवले. या पथकाने लिंबू राक्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी सचिन महाजन यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लिंबू राक्याकडून पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.