जळगाव प्रतिनिधी । महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ जागांची निवड जाहीर करण्यात आली असून यात भाजपचे सात तर शिवसेनेच्या एका सदस्याचा समावेश आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीचे नव्याने आठ सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा महापौर भारती सोनवणे यांनी बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत केली आहे. १६ सदस्यांची संख्या असलेल्या स्थायी समितीतील भाजपाच्या विद्यमान सभापती शुचिता हाडा यांच्यासह सात तर शिवसेनेचे असे एकूण आठ सदस्य स्थायी समितीमधून 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त होणार्या आठ जागांवर पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी नव्याने सदस्य निवडीकरिता बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा महापौरांनी बोलविली होती.
यावेळी भाजपाच्या निवृत्त होणार्या सात अॅड. शुचिता हाडा, दिलीप पोकळे प्रवीण कोल्हे, सुनील खडके, चेतन संकत, भगत बालाणी व सदाशिव ढेकळे तर शिवसेनेचे विष्णू भंगाळे यांच्या जागी या नव्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा महापौर भारती सोनवणे यांनी केली.
स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी महापौरांनी पक्षीय बलाबलनुसार आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे पक्षाचे गट नेते यांनी लेखी द्यावीत, असे आवाहन केले होते. त्यानुसार भाजपाचे गट नेते भगत बालाणी यांनी भाजपाचे सात सदस्य तर शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी शिवसेनेच्या एक सदस्याच्या नावाचे पत्र महापौरांकडे सादर केले होते. या सदस्यांची स्थायी समिती सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा महापौरांनी केली.
दरम्यान, भाजपतर्फे ललीत कोल्हे, सरीता नेरकर, किशोर बाविस्कर, ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, अमित काळे व कुलभूषण पाटील तर शिवसेनेतर्फे प्रशांत नाईक यांची स्थायी समिती सदस्य म्हणून याप्रसंगी निवड झाल्याचे महापौरांनी जाहीर केले.