जळगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्या निर्बंधांमधून ऑप्टीकल्स दुकाने, सीए, खासगी प्रवासी वाहतूक कार्यालये आदींना अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आलेली आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांनी आज निर्देश जारी केले आहेत.
कोविड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 5 एप्रिलच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यासाठी विशेष निर्बध लागू केले आहे. या निर्बधांतून खालील बाबींना काही अटींवर सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी निर्गमित केले आहे.
ऑप्टीकल दुकाने हे केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येतील. परंतु सदर दुकानात काम करणारे कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, तसेच कोविड लसीकरण न केल्यास दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
जळगाव शहर मनपा क्षेत्रात शासकीय व खाजगी रुग्णालयास चादरी, बेडशिट व इतर अनुषंगिक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या दुकानांना गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचेकडून व जळगाव शहर मनपा क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रात संबंधित तहसिलदार यांचेमार्फत आवश्यकतेनुसार दिनांकास ठराविक वेळेकरीता दुकान उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. तथापि अशी दुकाने सुरु करतांना संबंधित दुकान चालकांना संबंधित रुग्णालयाकडून पुरवठा करण्याबाबतची लेखी मागणी सादर करावी लागेल. अशा दुकानदारांना परवानगी घेतल्यानंतर मागणी केलेले सहित्य काढून दिल्यानंतर लगेच दुकान बंद करावे लागेल. तसेच सदर दुकानात काम करणारे कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, कोविड लसीकरण न केल्यास दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून कोविड -19 RTPCR चाचणीचा निगटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
अभ्यासिका (लायब्ररी, वाचनालये) यांना केवळ 50% क्षमतेच्या मर्यादेत फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येतील. परंतू सदर अभ्यासिकेमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच अभ्यास करणारे विद्यार्थी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, तसेच कोविड लसीकरण न केलेल्या कर्मचरी/विदयार्थी यांना दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून कोविड-19 RTPCR चाचणीचा निगटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
खाजगी प्रवाशी वाहतुक कार्यालये हे फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येतील. परंतु सदर दुकानात काम करणारे कर्मचारी तसेच प्रवासी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, तसेच कोविड लसीकरण न केल्यास दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील दिनांक 5 एप्रिल, 2021 च्या आदेशात इतर खाजगी कार्यालयामध्ये फायनान्शीअल मार्केट, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, ऑल नॉन बॅकीग फायनान्शीअल कार्पोरेशन्स यांना सुट देण्याबाबत नमूद असल्याने चाटॅर्ड अकाऊंटन्ट यांना त्यांची कार्यालये फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच त्यांनी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष संबंधीत नागरीकांना प्रवेश न देता त्यांना ईमेलव्दारे अथवा दूरध्वनीव्दारे आवश्यक असलेल्या कागदपत्राची मागणी करण्यात यावी. तसेच कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमीत करणेत आलेल्या सर्व सुचनांचे पालन करणेत यावे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.