जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे रावसाहेब पाटील यांचे आज निधन झाले आहे.
तालुक्यातील धानवड येथील रहिवासी रावसाहेब पाटील यांचे आज सकाळी निधन झाले. उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते चार वेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले होते. त्यांनी जि.प. सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, विकासो चेअरमन आदी विविध पदे भूषविली. ते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख होते. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश घेतला होता.
दिवंगत रावसाहेब पाटील हे युवासेनेचे माजी जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून संवेदना व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.