जळगाव प्रतिनिधी । प्रांतिक तेली समाजाचे विभागीय अध्यक्ष आर. टी. अण्णा चौधरी यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष, जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष खंबीर ज्येष्ठ नेते, आर. टी आण्णा चौधरी यांचे आज १ मे रोजी पहाटे चार वाजता निधन झाले. ते भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक महेश चौधरी यांचे वडील होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी मेहरूण येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
तैलीक समाज संघटनेत देश पातळीवर आर.टी. अण्णांचा लौकीक होता. समाजातील सर्वमान्य नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने पुढाकार होता. प्रांतीक तैलीक समाजाचे विभागीय अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळापर्यंत आपल्या कामाची अमिट छाप उमटवली आहे. त्यांच्या माध्यमातून समाजातील एक मातब्बर सेवाभावी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत असून त्यांना समाजाच्या विविध स्तरांमधून आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.