जळगाव प्रतिनिधी । मॉरीशसचे माजी पंतप्रधान तथा राष्ट्रपती अनिरूध्द जगन्नाथ यांच्या निधनामुळे एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येत असून यामुळे आज जिल्ह्यात कोणतेही शासकीय कार्यक्रम होणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
याबाबत वृत्त असे की, मॉरिशसचे माजी पंतप्रधान आणि माजी राष्ट्रपती अनिरूध्द जगन्नाथ यांचे काल निधन झाले. ते मूळचे भारतीय होते. मॉरिशसच्या प्रगतीत त्यांच्या नेतृत्वाचा मोलाचा वाटा होता. भारत आणि मॉरिशसमधील संबंधातही त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांच्या योगदानामुळे केंद्र सरकारने आज देशात एक दिवसीय दुखवटा पाळण्याचे जाहीर केले आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आज जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कोणतेही करमणुकीचे कार्यक्रम होणार नाहीत. तर, नियमित राष्ट्रध्वज ज्या कार्यालयांवर फडकावण्यात येतो तो आज अर्ध्यावर उतारण्यात येणार असल्याचे निर्देश जारी केले आहेत.