जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे वरिष्ठ अधिकार्यांसह जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रांना भेटी देऊन रूग्णांशी संवाद साधणार आहेत. हा उपक्रम आजपासून सुरू होत आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह १७ अधिकारी जिल्ह्यातील प्रत्येकी दोन प्रतिबंधित क्षेत्रांना भेट देऊन गृह विलगीकरणात असलेल्या किमान १० रुग्णांच्या घरांना भेटी देणार आहेत. या भेटीमध्ये अधिकारी उपचाराच्या कार्यवाहीबाबत तपासणी करणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून संबंधित इन्सिडेंट कमांडर यांनी घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांना भेटी देऊन पाहणी करण्यात येणार आहे. नियुक्त अधिकारी नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात ५ सप्टेंबर रोजी पहिली भेट देणार आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील हे संपूर्ण जिल्ह्यात कोठेही भेट देणार आहेत. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन हे धरणगाव तालुक्यात भेट देणार आहेत. उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे हे जळगाव, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते जामनेर, विशेष भूसंपादन अधिकारी किरण सावंत भुसावळ, डॉ. पी. सी. शिरसाठ बोदवड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी मुक्ताईनगर, आर. आर. तडवी रावेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. गायकवाड यावल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे चोपडा, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील अमळनेर व उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे हे पाचोरा तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रांना भेट देणार आहेत. या भेटींचा एकत्रित अहवाल निष्कर्षासह १४ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात येणार आहे.