जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे नगरपरिषद होणार असल्याचे स्पष्ट झाले असून आज याबाबत नागरिकांकडून नगरविकास प्रशासनाने आक्षेप मागविले आहेत.
भूतकाळात मोठी बाजारपेठ म्हणून लौकीक असणारे नशिराबाद येथे आजवर १७ सदस्यांची ग्रामपंचायत कार्यरत होती. गत वर्षाच्या अखेरीस झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधीच येथे नगरपंचायत होण्याचे संकेत मिळाल्याने निवडणुकीबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला होता. यात सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी अभूतपुर्व एकजूट दाखवत १७ पैकी १६ जागांवर एकही सदस्य उभा केला नाही. यानंतर येथील ग्रामपंचायतीवर प्रशासकाचा अंमल होता.
या पार्श्वभूमिवर, नशिराबाद येथे नगरपंचायत नव्हे तर नगरपरिषद होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आज वर्तमानपत्रांमध्ये याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तेथील नागरिकांकडून नगरपरिषदेच्या प्रस्तावाबाबत नागरिकांचे आक्षेप मागविण्यात आले असून याची मुदत एक महिन्यापर्यंत ठेवण्यात आली आहे. या कालावधीत नागरिक कोणत्याही बाबीवर आक्षेप नोंदवू शकतील. यानंतर नगरपरिषदा निर्मितीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये नशिराबाद येथे नगरपरिषद अस्तित्वात येऊन निवडणुका घेतल्या जातील हे देखील आता स्पष्ट झाले आहे.