जळगाव प्रतिनिधी । शहरात अनेक समस्या असून याचे निराकरण होत नसल्याच्या कारणावरून माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी स्थायी सभेत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सभात्याग केला.
महापालिकेची स्थायी समितीची सभा मंगळवारी सकाळी ११ वाजता सभापती राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आयुक्त सतीश कुळकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे, उपायुक्त प्रशांत पाटील, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य नितीन लढ्ढा यांनी ३१ डिसेंबर रोजी झालेल्या सभेत अनुकंपाच्या भरतीबाबत सविस्तर चर्चा झाली होती. त्यावेळी आयुक्तांनी याप्रश्नी महिनाभरात कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्याबाबत काय कार्यवाही केली याची विचारणा केली. त्यावर संबंधीतांना उत्तर देता न आल्याने लढ्ढा संतप्त झाले.
यानंतर लढ्ढा यांनी जळगावातील नागरी समस्यांवरून जोरदार टोलेबाजी केली. समस्यांचे जंजाळ सुटत नसल्याने नागरिक शिव्यांची लाखोली वाहतात. उद्या ते जोडेही मारतील असे ते म्हणाले. आश्वासन प्रत्यक्ष कृतीत येत नाही तोपर्यंत सभा ठेवू नये असेही त्यांनी सांगितले. यानंतर शिवसेनेचे २, भाजप १ व एमआयएमच्या नगरसेविका अशा चार जणांनी सभात्याग केला.