जळगाव प्रतिनिधी । मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या ताब्यावरून वाद सुरू असतांना निलेश भोईटे आणि त्यांच्या सहकार्यांना पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मविप्र संस्थेच्या ताब्यावरुन अॅड. विजय पाटील व नीलेश भोईट यांच्या गटात वाद सुरू आहेत. यातच जिल्हा न्यायालयाच्या एका आदेशाचा हवाला देत अॅड. विजय पाटील यांच्या गटाने संस्थेच्या कार्यालयाचा ताबा घेतला होता. यानंतर२६ मार्चला नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारातील संस्थेच्या कार्यालयाबाहेर उभी नीलेश भोईटे यांच्या कारची अज्ञातांनी तोडफोड केली होती.
यानंतर नीलेश भोईटे, रवींद्र भास्कर सोनवणे यांच्यासह पाच जणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात संबंधीत प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी. संस्था कोणाच्या ताब्यात आहे हे न्यायालयाने जाहीर करावे अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व बी. यु. देबदवार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने २६ मार्चला घडलेल्या घटनेची चौकशी करावी. याचिकाकर्त्यांना म्हणजेच भोईटेंसह सोनवणे व कर्मचार्यांना संस्थेत जाण्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरवावा, असे नमूद केले. या बंदोबस्ताचा खर्च याचिकाकर्त्यांनी करावा असेही आदेशात नमूद केले आहे. या आदेशानुसार नीलेश भोईटे हे सोमवारी पोलिस बंदोबस्तात संस्थेच्या कार्यालयात कामकाजासाठी जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या संस्थेचा ताबा कोणत्या संचालक मंडळाकडे असावा या बाबत न्यायालयाने आदेश करावे अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. परंतु, या बाबत उच्च न्यायालयाने आदेश दिला नाही. न्यायालयाचे मत आहे.