जळगाव प्रतिनिधी । येत्या नवीन शैक्षणिक वर्षातील शाळांना १५ जूनपासून सुरुवात होणार असून यात पहिल्यांदा शाळा ऑनलाईन या प्रकारात सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. याबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शन सूचनांची प्रतिक्षा असल्याचेही सांगण्यात आले आहे.
नवीन वर्षाच्या शालेय नियोजनाबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांची भेट घेवून चर्चा केली. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध बर्याच प्रमाणात उठविण्यात आले असले तरी शासनाकडून शाळांमध्ये विद्यार्थांना बोलवण्याबाबत अद्याप आदेश नाहीत. मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट ओढवल्याने राज्यासह जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. एप्रिलच्या नियोजनानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुटी याबाबत शिक्षण संचालनालयाकडून निश्चिती करण्यात आली होती. यानुसार १ मेपासून उन्हाळी सुट्या लागू करण्यात आल्या. १४ जून रोजीपर्यंत या सुट्या आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार १४ जून रोजी शाळा सुरू करण्यात याव्या. शाळांतून उन्हाळ्याची तसेच दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्या इतर सणांसाठी देण्यात याव्या. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शासकीय तसेच खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले असून यानुसार आता शाळांचे कामकाज हाती घेण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी १५ जूनपासून ऑनलाईन शाळा सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासनाच्या नियोजनानुसार उन्हाळी सुट्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे ५६ दिवसांच्या उन्हाळी सुट्या ग्राह्य धरण्यात आलेल्या आहेत. १५ जूनपासून वर्ष सुरू केले जाणार आहे. विद्यार्थ्यांबाबत व शाळा पूर्णपणे सुरू करण्याबाबत अद्याप काही सूचना आलेल्या नाहीत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी दिली आहे.