जळगाव प्रतिनिधी । सोमवारी चंद्रदर्शन न झाल्यामुळे आता पवित्र रमजानच्या पर्वाला बुधवारपासून प्रारंभ होणार असल्याची घोषणा रूहते हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना उस्मान कासमी यांनी केली आहे.
सोमवारी सायंकाळी जामा मशिद येथे रूहते हिलाल कमिटीची सभा झाली. यात मौलाना जाकिर देशमुख, हाफिज रेहान बागवान, हाफिज वसीम पटेल, मौलाना जुबेर, यासह सय्यद चाँद, इदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख, मुकीम शेख, अश्फाक बागवान, अनिस शाह, अॅड. सलीम शेख, ताहेर शेख, इक्बाल बागवान उपस्थित होते. यावेळी शहरे काजी मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी चंद्र दर्शनाची पार्श्वभूमी समजावून सांगितली.
माहे रमजानचे चंद्र दर्शन सोमवारी रात्री न झाल्याने रमजान पर्वाला बुधवारपासून सुरुवात होईल. पहिली तरावीहची नमाज मंगळवारी रात्री होईल व रोजा (उपवास) बुधवारी होईल, असे जळगाव रूहते हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना उस्मान कासमी यांनी घोषित केले. रमजान पर्व साजरे करताना कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना केले.