जळगाव प्रतिनिधी । लोक कशाचा काय उपयोग करतील याचा नेमच नाही, याची प्रचिती आज जळगावात आली आहे. एका बहाद्दराने चक्क लोकांनी वापरून फेकून दिलेल्या मास्कच्या मदतीने गादी तयार करण्याची शक्कल लढविल्याचे आज उघडकीस आले असून पोलिसांनी त्याच्या विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत वृत्त असे की, कोविडच्या आपत्तीमुळे मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात सिव्हीलसह अन्य कोविड हॉस्पीटल्स, कोविड केअर सेंटर्स आदींपासून ते वैयक्तीक पातळीवर मास्क मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. याच सोबत वापरून झालेले मास्क हे उघड्यावर निष्काळजीपणे फेकून दिले जात असून यातूनही कोविडचा संसर्ग पसरण्याची भिती आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत अनेकदा वृत्तांकन करून देखील वापरलेले मास्क व्यवस्थितरित्या नष्ट करण्याची कोणतीही प्रणाली वापरात येत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे अगदी गल्लीबोळांसह हॉस्पीटल्सच्या बाहेर मास्क फेकून दिलेले दिसतात. याच मास्कचा वापर करून एकाने गादी तयार करण्याचा प्रकार आज कुसुंबा शिवारात उघडकीस आला आहे.
कुसुंबा गावाजवळ हॉटेल कृष्णा गार्डनच्या पाठीमागे महाराष्ट्र गादी भंडार हे दुकान आहे. येथील दुकानदार हा लोकांनी उघड्यावर फेकून दिलेले मास्क गादीमध्ये भरून वापरत असल्याची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकाला मिळाली होती. या अनुषंगाने खातरजमा केल्यानंतर रविवारी दुपारी या दुकानात एमआयडीसी पोलिसांचे पथक गेले असता त्यांना अमजद अहमद मन्सुरी (वय ३८, रा. असलम किराणा जवळ, आझादनगर, जळगाव) हा गादीमध्ये चक्क वापरलेले मास्क भरत असल्याचे आढळून आले.
यामुळे अमजद अहमद मन्सुरी याच्या विरूध्द भादंवि कलम १८८, २६९ अन्वये औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर पोलिसांनी तातडीने त्याच्या कडे असणारा मास्कचा साठा जाळून नष्ट केला आहे.