जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदा जळगाव ते शिर्डी पायी पालखी पदयात्रा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
ओम साई मित्र मंडळातर्फे दरवर्षी जळगाव ते शिर्डी पायी पालखी दिंडी सोहळा काढण्यात येतो; पण यंदा कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. परंपरा जपण्यासाठी पाच पावले पालखी काढण्यात आली. यात सोमवारी सकाळी बळीरामपेठेतील साईबाबा मंदिरात ९ जोडप्यांनी सपत्नीक मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीला व पालखीतील साईबाबांच्या मूर्तीला अभिषेक करून आरती केली. त्यानंतर श्री दत्त मंदिरापर्यंत साईंच्या गजरात पालखीसह पदयात्रा काढून परंपरा कायम ठेवण्यात आली. ही पालखी शनिपेठेतील किरण टेन्ट हाऊस येथे ४ जानेवारीपर्यंत मुक्कामी राहणार आहे.
याप्रसंगी ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र हसवाल यांच्यासह विजय झंवर, किशोर देशमुख, महादू बोरकर, संजय टाक, सागर मणियार, तुषार सोनार, ललित परमार, गोपाल बारी, मुन्ना दलाल, दिनेश गवळी, सोमेश जाजू, राजू पाटील, आशिष पाटील, गजानन बोरकर आदी साईभक्त सहभागी झाले होते.