भाजपमध्ये कलहाचा भडका; बैठकीत दोन पदाधिकारी भिडले

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील पदाधिकार्‍यांमध्ये अंतर्गत कलहाची चर्चा असतांनाच गटनेते भगत बालाणी व महिला व बालकल्याण समिती सभापतींचे पती भरत सपकाळे यांच्यात जोरदार हमरातुमरी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत वृत्त असे की, भाजपच्या बैठकीचे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे तसेच महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. यासाठी महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे यांचे पती भरत सपकाळे व भाजपचे महापालिकेतील गटनेते भगत बालाणी हे दोघेही कार्यालयात आले. सपकाळे यांनी बालाणी यांना आयुक्तांच्या दालनात ते चुकीचे बोलल्याबद्दल जाब विचारला. यावरून सपकाळे व बालाणी यांच्या जोरदार हमरातुमरी झाली. जिल्हाध्यक्ष आमदार भोळे व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी हस्तक्षेप करत हा वाद सोडविला. मात्र त्यानंतर बालाणी यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.

दरम्यान, गटनेते बालाणी हे नगरसेवकांना अपमानजनक वागणूक देतात. आयुक्तांच्या दालनात ते मला चुकीच्या पध्दतीने बोलले होते. त्यासंदर्भात जाब विचारला असता पुन्हा माझ्यावर आवाज वाढवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शाब्दीक चकमक उडाल्याचे भरत सपकाळे यांनी मान्य केले. तर भगत बालाणी यांनी कोणत्याही प्रकारचा वाद झाला नसल्याचा दावा केला.

भारतीय जनता पक्षातील गटबाजी अनेकदा चव्हाट्यावर आली असतांना रविवारी सायंकाळच्या प्रकाराने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content