जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता विभागाने आधीच उत्तम कामगिरी करून स्वच्छता अभियान यशस्वी केले आहे. यातच आता पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरच्या दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात आमचे राज्य सक्रीय सहभाग घेण्यासाठी सज्ज असल्याचे आश्वासन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. सदर उपक्रमाबाबत आज केंद्रीय जलशक्ती व स्वच्छता मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी देशातील सर्व राज्यांच्या स्वच्छता मंत्र्यांसोबत व्हिसीच्या माध्यमातून संवाद साधला असता ना. गुलाबराव पाटील यांनी यात मोठ्या प्रमाणात जनसहभाग राहणार असल्याची ग्वाही दिली.
याबाबत वृत्त असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरच्या दरम्यान देशात ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय जलशक्ती व स्वच्छता मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज देशातील सर्व राज्यांच्या स्वच्छता मंत्र्यांशी संवाद साधला. यात महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील हे जळगावातून व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सहभागी झाले. ना. गुलाबराव पाटील हे आज अजिंठा शासकीय विश्रामगृहातून या संवादात सहभागी झाले. याप्रसंगी त्यांनी राज्य शासनातर्फे स्वच्छता खात्याच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामगिरीची माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही स्वच्छ भारत अभियान हे राज्यात यशस्वीपणे राबविले आहे. यात वैयक्तीक आणि सार्वजनीक शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टीक कचरा व्यवस्थापन, शौचालयांचे रेट्रो फिडींग आदी कामांना गती देण्यात आली असून यातून ग्रामीण आणि शहरी स्वच्छतेला साधण्यात आलेला आहे.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांमध्ये आम्ही या अभियानाच्या अंतर्गत आम्ही व्यापक उपक्रम राबविणार आहोत. यात गावांमध्ये स्वच्छता; गावातील कचराकुंडा आणि अन्य असुरक्षित भागांची सफाई; कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा विलग करण्याबाबत जनजागृती; कचरा संकलन आणि विलगीकरणासाठी स्वतंत्र प्रणाली उभारणे; जैविक विघटन न करता येण्यायोगा प्लास्टीकचा कचरा घरातच विलग करण्याचे नियोजन करणे; पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ करून तेथे वृक्षारोपण करणे; एकल प्लास्टीक वापराच्या दुष्परिणामाबाबत जनजागृतीपर सभा आयोजीत करणे, शासकीय नियमांची अंमलबजावणी करणे; हागणदारीमुक्तीसह स्वच्छतेबाबत सरपंच परिषद घेणे; घोषवाक्य लेखन स्पर्धेच्या आयोजनासह याच्या सार्वजनिक प्रतीज्ञांचे कार्यक्रम आयोजीत करणे आणि प्लास्टीक बंदी आणि स्वच्छता या विषयांवर वक्तृत्व, घोषवाक्य, रांगोळी, सजावट आणि देखावा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करणे आदी उपक्रम राबविणार आहोत. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सदर अभियान यशस्वी करण्याचे याप्रसंगी आवाहन केले.
या अभियानात लोकसहभाग हा जास्तीत जास्त कसा होईल ? याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. यात अनेक सामाजिक व धार्मिक संस्था व लोकसहभाग घेणार आहे. विशेष करून कोकणातील रेवदंडा येथील धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता मोहिमेत राज्य सरकारला केलेल्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कचरा संकलन, गाव व शहर स्वच्छता, वृक्षारोपण/वृक्षसंवर्धन आदींसारखे विविध उपक्रम राबविणार्या धर्माधिकारी प्रतिष्ठानला स्वच्छता ही सेवा या उपक्रमात सहभागी करण्यासाठी आम्ही विनंती करणार असून ते यात सहभागी होतील अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्नेहलता कुडचे, यांच्यासह स्वच्छता विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी आर. व्ही.भदाणे व कर्मचारी उपस्थित होते.