भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तोतया तिकिट तपासनीसाला रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीकडच्या काळात तोतया तिकिट तपासनीस मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. येथील आरपीएफने अशाच एका तोतयाला ताब्यात घेतले आहे. बरौनी-अहमदाबाद एक्सप्रेसच्या जनरल बोगीत एक टिटिई प्रवाशांकडून तिकिट तपासणी करून दंड घेत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली होती. यानुसार, रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने जाऊन त्याला ताब्यात घेतले.
या तोतयाचे नाव राज भैयालाल मालवीय (रा. गाडगेबाबा नगर, अमरावती) असून त्याच्याकडे बनावट स्टँप अंकीत केलेले दंड पावतीचे पुस्तक आढळून आले. त्याची झडती घेऊन या पुस्तकासह अन्य सामग्री जप्त करण्यात आली. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उप निरिक्षक ए.के. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखालील प्रेम चौधरी, जयकुमार, नथू पडघन यांच्या पथकाने केली. या तोतयाच्या विरोधात खंडवा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.