जळगाव प्रतिनिधी । शहरातील अक्सानगर परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे यांचाही समावेश आहे.
मेहरुणमधील अक्सा नगरात रविवारी सायंकाळी दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली. यात लोखंडी सळई व कुर्हाडीचा वापर झाला असून दगडफेकही झाली. योत पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांकडून देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीसात दंगल व प्राणघातक हल्ल्याचे दोन स्वतंत्र आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
यात पहिली फिर्याद अनिस कुरेशी अब्दुल सत्तार कुरेशी (२७) यांनी दिली. यानुसार मटण विक्री करण्यासाठी नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे यांनी हप्ता व मोफत मटणाची मागणी केली. ते दिली नाही तर गुरे चोरीची खोटी केस दाखल करेल असे धमकाले. त्यास नकार दिला असता नगरसेवक इकबालोद्दीन जियाउद्दीन पिरजादे, दारा इकबालोद्दीन पिरजादे, बबल्या, राजू पिरजादे, सोहेल पिरजादे, मुजाहीद्दीन जहांगीरदार, कपील मुजाहीद जहांगीरदार, जबी पिरजादे, मुन्नवर पिरजादे, रउफ माजीद, माजीद मिया, दानिश धन्नो, रहीम दादा व जावेद हाफिस यांनी मारहाण करायला सुरुवात केली. दारा पिरजादे याने डोक्यात कुर्हाड टाकली तर इतरांनी लोखंडी सळई व दगडांचा मारा केल्याने कुटुंबातील चार जण जखमी झाल्याचे म्हटले आहे.
तर दुसरी फिर्याद इकबोलद्दीन पिरजादे यांनी दिली आहे. त्यानुसार रविवारी पिरजादे यांच्या ताब्यातील एक गाय मिळुन आली नाही. त्यामुळे पिरजादे हे गायीचा शोध घेण्यासाठी कसाई वाड्यात गेले. तेथे सत्तार शेख गफुर कुरेशी याच्या गोडाऊमध्ये गायीचा शोध घेत होते. यावेळी सत्तार यांचे भाऊ रईस, अनिस, मुक्तार व जब्बार तेथे आले. राग आल्यामुळे त्यांनी आम्ही चोर दिसतो का? असा प्रश्र करीत सत्तार कुरेशी, अनिस कुरेशी, मुक्तार कुरेशी, जब्बार कुरेशी, भोल्या रशिद कुरेशी, जावेद रशिद कुरेशी, वसीम कुरेशी, अरबाज कुरेशी, बाबु कुरेशी, नाजीम कुरेशी, अब्रार कुरेशी, शेख अनिस शेख हयास जामनेरवाला यांनी पिरजादे यांच्यावर हल्ला चढवला. यातील एकाने पिरजादे यांच्या डोक्यात कुर्हाड मारली तर इतरांनी दगडफेक करुन त्यांना जखमी केले. असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे, पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत.