जळगाव प्रतिनिधी । शहरातील काही बिल्डर्सला धमकावून खंडणीची मागणी करणार्या राहूल सुरेश हटकर याला पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत.
राहुल सुरेश हटकर (रा.हरिविठ्ठलनगर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात दहा पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.
राहुल सुरेश हटक (रा. हरिविठ्ठलनगर) याच्या विरूध्द काही बिल्डर्सनी तक्रार दिली आहे. यात २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता रामेश्वरलाल बन्सीधर सैनी (वय ४५, जिजाऊनगर, वाघनगर) यांच्या दुकानावर गेला. त्याच्यासोबत एक अनोळखी तरुणदेखील होता. राहुलने सुरुवातीला सैनी यांच्याकडून ५०० रुपये मागितले. त्यांनी नकार देताच त्याने चाकू काढून त्यांना धमकावले. आठ दिवसांपूर्वीदेखील राहुल अशाच प्रकारे धाक दाखवून सैनी यांच्याकडून ५०० रुपये घेऊन गेला होता.
त्याचे हे प्रकार वाढत असल्याने सैनी यांनी सोबतच्या इतर बांधकाम व्यावसायिकांशी चर्चा केली. यात प्रकाश छत्रमल राठी (रा.वाघनगर); सुरेशकुमार सैनी; किशोर रामगोपाल प्रजापत; जगदीश प्रसाद सैनी व छगन श्रीरामचंद्र सैनी यांनाही चाकूचा धाक दाखवून पैसे मागण्याची धमकी दिल्याचे चर्चेतून समजले. यामुळे या सर्व बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन राहुलकडून होणार्या त्रासाची तक्रार पोलिसांकडे केली. रामेश्वरलाल सैनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुलविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राहुल याला अटक केली आहे.
दरम्यान, राहुल हा हटकर गँगचा सदस्य असून त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. तो जामिनावर बाहेर होता.