बीएचआर प्रकरणात तब्बल २५०० पानांचे दोषारोपपत्र; पाच जणांवर आरोप

जळगाव प्रतिनिधी । बहुचर्चीत बीएचआर घोटळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेतर्फे तब्बल २५०० पानांचे पहिले दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून यात पाच जणांनी ६१ कोटी ९० लाख रूपयांचा घोटाळा केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बीएचआर घोटाळाप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात पुणे येथील न्यायालयात पहिले दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्रात सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम सांखला, कमलाकर कोळी व सुजीत वाणी या पाच जणांविरुद्ध २५०० पानांचे हे दोषारोपपत्र असून यात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांची फसवणूक, अपहार केल्याचा आरोप केला आहे. उर्वरित गुन्ह्याचे पुरवणी दोषारोप पुढील तारखेस न्यायालयासमोर ठेवले जातील. त्यावर दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.

सुमारे १२०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात पुण्यातील डेक्कन, आळंदी व शिक्रापूर या तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. डेक्कन पोलिस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात पोलिसांनी ८९व्या दिवशी तपास पूर्ण करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात दोषारोप सादर केले. याप्रसंगी सरकारी वकील प्रवीण चव्हाण, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके, पोलिस निरीक्षक सुचिता खोकले, त्रयस्थ अर्जदार अ‍ॅड. अक्षता नायक उपस्थित होते.

Protected Content