जळगाव प्रतिनिधी । येथील सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून संस्थेची निवडणूक होईपर्यंत प्राधीकृत अधिकारी मंडळाकडे सूत्रे असतील.
याबाबत वृत्त असे की, जळगाव ग.स. सोसायटीची मुदत गेल्या वर्षीच संपली आहे. मात्र कोरोनाच्या आपत्तीमुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. अलीकडेच सत्ताधारी संचालकांमध्ये वाद सुरू झाल्याचे दिसून आले आहे. ग.स. सोसायटीतील सत्ताधारी लोकसहकार गटाच्या पाच संचालकांनी अध्यक्ष मनोज पाटील यांच्याविरुद्ध बंड केले. दोन्ही गटाच्या १४ संचालकांनी २८ जानेवारी रोजी राजीनामा दिला होता. यामुळे सत्ताधारी अल्पमतात आले होते. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्तीची मागणी होती.
या अनुषंगाने १४ संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत सोमवारी जिल्हा उपनिबंधकांकडून पडताळणी करण्यात आली. यानंतर ग.स. सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. यानंतर लागलीच जिल्हा उपनिबंधकांनी सोसायटीवर प्राधिकृत अधिकारी मंडळ नेमण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संस्थेचे मावळते अध्यक्ष मनोज पाटील यांच्या विरूध्द तीन अपत्यप्रकरणी अपात्र करण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.