जळगाव प्रतिनिधी । कामात कुचराई केल्या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी तर दांडी मारणार्या जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी निलंबीत केले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असताना अनेक शिक्षक शाळेत उपस्थित राहत नाहीत. यासंदर्भात तक्रारी वाढल्याने मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून पथक पाठवून शाळांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यात काही शाळांमध्ये शिक्षकांनी विनापरवानगी शाळेला दांडी मारल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश सायंकाळी काढण्यात आले. वाडे (ता. भडगाव) येथील मुलांची आणि मुलींच्या शाळेत तपासणी करण्यात आली. त्यात एकूण ५ शिक्षक गैरहजर होते. त्यांना निलंबित केले आहे. उत्राण (ता. एरंडोल) येथील शाळेत ४ शिक्षक गैरहजर होते. तसेच मोरझिरा (ता. मुक्ताईनगर) येथे ३ शिक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व १२ शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी बुधवारी निलंबित केले.
दरम्यान, चुकीची माहिती देणे, कर्तव्यात कसूर करण्यासह अन्य आरोप असलेले मुक्ताईनगरचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनाही निलंबित करण्याचे आदेश काढले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.