जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादीने पाकिट न मिळाल्यानेच भाजपवर बिनबुडाचे आरोप केल्याचा पलटवार भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी कचर्याच्या ठेकेदाराकडून महापालिकेतील ६० नगरसेवकांना दरमहा १५ हजार रूपयांचे पाकिट मिळत असल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमिवर भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून पलटवार केला आहे. यात म्हटले आहे की, राष्ट्रवादीच्या बिनबुडाच्या आरोपाला भाजपत थारा नाही. राष्ट्रवादीचा चमकोगिरीचा प्रयत्न आहे. पालिकेने एकहाती ठेका दिल्याने विरोधकांची कमाई बंद झाली आहे. राष्ट्रवादीला मनपा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही पराभव झाला. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे अन्यथा जनतेची जाहीर माफी मागावी. आरोपापेक्षा जनतेची सेवा करावी,
यात पुढे नमूद केले आहे की, भाजपच्या नगरसेवकांकडून सेवेचा आदर्श घ्यावा. एकही नगरसेवक निवडून आणण्याची पत नसलेला पक्ष शहरात विकास कामांना अडथळा निर्माण करण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्षांनी ठेकेदाराकडून पाकिटाच्या अपेक्षेने हे आरोप केल्याचा आरोपही सूर्यवंशी यांनी केला. माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळे यांनी तत्कालीन सरकारकडून १०० कोटींचा निधी मंजूर करून आणलेला होता. आताच्या सरकारने हा निधी स्थगित केला आहे. वॉटर ग्रेसने प्रशासनाच्या सूचनेने शहरात साफसफाईचे काम परत सुरू केलेले आहे. प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्तीसाठी ५० लाखांचा निधी देण्याबाबत आमदार भोळे यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेतली आहे. या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपने केला.