जळगाव प्रतिनिधी । बीएचआर सहकारी पतसंस्थेच्या अवसायकपदी चैतन्य नासरे यांची नियुक्ती झाली असतांनाही त्यांना हिंगोली येथील पदमुक्त करण्यात येत नसल्याने त्यांनी अखेर या प्रकरणी सहकार आयुक्तांना पत्र दिले आहे.
बीएचआर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे हा फरार झालेला आहे. त्याच्या जागेवर हिंगणा येथील सहाय्यक निबंधक नासरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याबाबत केंद्रीय निबंधकांनी १८ जानेवारी रोजी आदेश काढलेले आहेत. या आदेशाला एक महिना पूर्ण झाला असला तरी त्यांनी कार्यमुक्त करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. सहकार आयुक्त व मंत्रालय अशी टोलवाटोलवी नियुक्ती प्रकरणात सुरू आहे.
दरम्यान, एक महिना होऊनही पदमुक्तीचे आदेश न आल्याने अखेर चैतन्य नासरे यांनी सहकार आयुक्तांना मंगळवारी पत्र पाठवले आहे. पत्राद्वारे त्यांनी सहाय्यक निबंधकपदावरून मुक्त करण्याचे आदेश देण्याची आठवण करून दिली आहे. यामुळे आता तरी त्यांना पदमुक्त करण्यात येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.