जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वाळू तस्करांच्या टोळीवर पोलीस पथकाने कारवाई केली असून यात जळगाव महापालिकेतील भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्यावर मोक्का कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, वाळू तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आधीच देण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत जिल्ह्यात पहिला गुन्हा धरणगाव तालुक्यातील वाळू तस्करांच्या टोळी विरूध्द दाखल करण्यात आला आहे. यात धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथील गिरणा नदीच्या पात्रात गुरूवारी पहाटे कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुख्य सूत्रधारांसह डंपर चालकांसह १२ जणांवर संघटित गुन्हेगारीला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यात जळगावचे भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील याच्यावरही संघटित गुन्हेगारीला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला.
या कारवाईत पाच डंपरचालक, दोन खबरी आणि डंपर मालक मिळून कुलभूषण पाटीलसह १२ जणांवर भादंवि कलम ३०७, ३७९, ५११ सह गौण खनिज खनिज अधिनियम कलम २१ सह कलम २०२/१७७, १८४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. यात कुलभूषण पाटील (रा.जळगाव) याच्यावर संघटित गुन्हेगारीस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भयंकर बाब म्हणजे पोलिस पथकाला विरोध करताना चालक सिद्धार्थ अहिरे याने विनोद संदानशिव व प्रवाणी पाटील या पोलिस कर्मचार्यांच्या अंगावर डंपर घालून ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यातून ते सुदैवाने बचावले. कुलभूषण पाटील यांच्यावर आधी देखील गुन्हे दाखल आहेत. यात आता त्यांच्यावर नव्याने कारवाई करण्यात आली आहे.