मुंबई प्रतिनिधी | जळगाव जिल्हा राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक घेण्यात आली. यात तालुका निहाय आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादीची बहुप्रतिक्षित आढावा बैठक आज मुंबई उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. मध्यंतरी झालेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा आणि यानंतर जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांनी तालुक्यानिहाय घेतलेल्या बैठकीनंतर मुंबईत विस्तृत बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानुसार आज उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला अजितदादा पवार यांच्यासह जिल्ह्याचे निरिक्षक अविनाश आदिक, माजी मंत्री गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार मनीष जैन, संजय पवार, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहीणी खडसे; महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, महीला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, विनोद देशमुख, योगेश देसले, महानगराध्यक्षा मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, विलास पाटील, ओबीसी सेलचे उमेश नेमाडे, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, नामदेव चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यात अनेक मुद्यांवर चर्चा झाली. काही पदाधिकार्यांनी पक्षातील फुटीवर बोट ठेवले. तर संजय पवार यांनी हाच मुद्दा घेऊन सर्व नेत्यांनी एकत्र बसून वाद सोडविण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात तालुकानिहाय समित्यांच्या नियुक्तीत राष्ट्रवादीला डावलण्यात आल्याचा मुद्दा देखील चर्चेत आला. सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक पदाधिकार्यांनी फक्ते पदे घेतली असून ते काम करत नसल्याची तक्रार अनेक जणांनी केली. यावर याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे सूतोवाच अजितदादा पवार यांनी केले. सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष बदलाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित नेत्यांंशी चर्चा केली असून याबाबतचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे संकेत दिले.