जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघासाठी अनेक सक्षम उमेदवार असल्याचे ठासून सांगतांना या पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी मात्र एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम केल्याने उपस्थित अवाक झाले आहेत.
याबाबत वृत्तांत असा की, आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जवाब दो निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. यात नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. विशेष करून आमदार डॉ. सतीश पाटील यांनी अतिशय आक्रमकपणे राज्य व केंद्रासोबत स्थानिक पातळीवरील नेत्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे अनेक सक्षम नेते आहेत. यात त्यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. यावर देवकर यांनी कुणी नसल्यास आपण शेवटी असल्याचे नमूद केले. त्यांनी खुद्द सतीशअण्णांनाच लढविण्याचे सुचविले. यानंतर डॉ. सतीश पाटील यांनी देवकर यांना चिमटा घेत आता तरी हिंमत करा असे आवाहन केले. यावर रवींद्रभैय्या पाटील यांनी या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग सुरू असल्याचे सांगून सावधगिरीचा इशारा दिला. यावर डॉ. पाटील यांनी आपल्याला रेकॉर्डींग करणारे हवेच असल्याची टोलेबाजी केली. आणि तिकडे (रावेरमध्ये) कुणी नसले तरी रवींद्रभैय्या आहेच हे सांगताच हशा पिकला. तसेच जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी स्थानिक नेतेच सक्षम असून उगीच बाहेरच्यांची चर्चा करून त्यांचा टिआरपी वाढवू नका असेदेखील त्यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूक तोंडावर असतांना राष्ट्रवादीतील डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर व रवींद्रभैय्या पाटील यांच्यात रंगलेले नाट्य हे राजकीय निरिक्षकांसाठी कुतुहलाचा विषय बनले आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
पहा– राष्ट्रवादीत लोकसभेच्या उमेदवारीवरून रंगलेले नाट्य !