जळगाव, प्रतिनिधी | येथील मनपा स्थायी समितीची सभा आज नवनिर्वाचित सभापती अॅड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडली. याप्रसंगी आयुक्त डॉ.उदय टेकाळे, उपायुक्त अजित मुठे, उत्कर्ष गुटे, मिनिनाथ दंडवते, कॅफो संतोष वाहळे, नगरसचिव सुनील गोराणे हे उपस्थित होते. यावेळी शहरातील अस्वच्छतेबद्दल अनेक तक्रारी सभासदांनी मांडल्या.
सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या सहकार्याच्या भावनेने एकत्रीतपणे जळगावच्या विकासाची कामे मार्गी लावण्याचे आवाहन सभागृहात केले. स्वच्छ पारदर्शी कारभाराच्या दृष्टीने सभेत जे ठराव मंजूर झाले आहेत, ते २४ तासांच्या आत त्यांची सही होऊन नगरसचिव कार्यलयाकडे सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्थायी समितीची आठवड्यातून एक बैठक होणे आवश्यक असल्याने प्रत्येक शुकवारी सकाळी ११.०० वाजता ही बैठक आयोजित केली जाईल, असेही अॅड. हाडा यांनी सांगितले.
सभेत शहरातील अस्वच्छतेविषयी सभासदांनी नाराजी व्यक्त केली. सफाई मक्तेदाराच्या कामकाजाविषयीही सभासदांनी नाराजी व्यक्त केली. यावरून उपायुक्त दंडवते व आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांना सभासदांनी धारेवर धरले. सफाई न केल्याने मक्तेदारास दंड करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त दंडवते यांनी सभागृहात दिली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी शहराला दंडापेक्षा स्वच्छता महत्वाची असल्याची जाणीव करून दिली.
दरम्यान, उपायुक्त दंडवते यांनी एस.आय. कांबळे हे काम करीत नसल्याचा ठपका ठेवला असता सभासदांनी नाराजी व्यक्त केली. कांबळे हे उत्कृष्ट कार्य करीत असल्याचे सभासदांनी सांगितले. भंगाळे यांनी त्याच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये कांबळे हे कार्यरत असून त्यांच्या प्रभागातील ४ ही नगरसेवकांना त्यांच्या विषयी कोणतीही तक्रार नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच सभापती हाडा यांनीही कांबळे यांच्या कार्याचे कौतुक केले. शहरातील हद्दीत मेलेली जनावरे उचलणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भंगाळे यांनी केला. त्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरविण्यात यावे, अशी सूचना विष्णू भंगाळे, नितीन बरडे, नवनाथ दारकुंडे यांनी केली.