जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशीही इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बुधवार, २४ डिसेंबर रोजी विविध राजकीय पक्षांसह अपक्ष इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्जांची खरेदी केली असून, निवडणुकीतील चुरस आता अधिकच वाढल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणूक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशी एकूण ६१८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले. मात्र, आजच्या दिवशी एकाही उमेदवाराने अधिकृतरीत्या अर्ज दाखल केलेला नाही. अर्ज भरण्याची मुदत अद्याप शिल्लक असल्याने उमेदवारांकडून योग्य रणनीती आखूनच पुढील पावले टाकली जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

मंगळवार, २३ डिसेंबर रोजी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी सर्व १९ प्रभागांमधून तब्बल ७७७ अर्जांची विक्री झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ६१८ अर्जांची विक्री झाल्याने अवघ्या दोन दिवसांत एकूण १,३९५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. या आकड्यांवरून जळगाव महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेल्या अनपेक्षित निकालांनंतर महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रभागनिहाय ताकद आजमावण्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी, समीकरणे जुळविणे, तसेच पक्षांतर्गत चर्चा जोरात सुरू असल्याने सध्या अर्ज दाखल करण्याऐवजी अर्ज खरेदीवरच भर दिला जात असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेग घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जळगाव शहरात खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीची राजकीय रणधुमाळी रंगू लागली आहे.



