जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहराच्या विकासासाठी १०० कोटी रूपयांच्या निधीची मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली आहे.
जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी १०० कोटी रूपयांची मागणी केली. विशेष करून शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची अतिशय भयावह अवस्था झाली असून यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार भोळे यांनी केले आहे.
जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून आगामी निवडणुकांमध्ये हा मोठा मुद्दा बनण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर, आमदार राजूमामा भोळे यांनी रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १०० कोटींच्या विशेष निधीची मागणी केल्याचे मानले जात आहे.