जळगाव प्रतिनिधी- काही कृषी केंद्र चालक लिंकींगच्या माध्यमातून शेतकर्यांची लुबाडणूक करत असल्याची चर्चा असून अशा चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला. शासकीय भरड धान्य खरेदीस चिंचोली व म्हसावद येथे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सह.संस्थेमार्फत तर म्हसावद येथे शेतकी संघामार्फत शासकीय किमान आधारभूत रब्बी भरड धान्य खरेदी योजनेस प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्याहस्ते काटा पूजन करून आजपासून धान्य खरेदी सुरू करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन शैलजादेवी दिलीप निकम होत्या. पालकमंत्र्यांनी काटा पूजन करून धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यांना पेढा भरवून त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, किमान आधारभूत किंमत योजनेच्या अंतर्गत अंतर्गत जिल्ह्यात एकूण १७ खरेदी केंद्र असून ज्वारीसाठी २५ हजार ५०० क्विंटल, मकासाठी ६० हजार क्विंटल तर गहुसाठी २ हजार २४० क्विंटल खरेदीचे उद्दिष्टे मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्टे कमी पडत असल्याने वाढीव उद्दीष्ट साठी व मुदत वाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती ना. पाटील यांनी दिली. शेतकर्यांनी धान्य खरेदी केंद्रांच्या सुविधेचे लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
दरम्यान, सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असतांना शेतकर्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून बळीराजाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले. काही कृषी केंद्र चालक हे लिंकींगच्या माध्यमातून लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत शेतकर्यांची तक्रार केल्यानंतर संबंधीतांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील ना. पाटील यांनी याप्रसंगी दिला.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, तहसिलदार नामदेव पाटील, संस्थेचे चेअरमन शैलजादेवी निकम , अजबराव पाटील, नियोजन समितीचे सदस्य तथा संचालक वाल्मिक पाटील , व्हाईस चेअरमन संजीव पाटील , रवी कापडने , संचालक रमेशअप्पा पाटील, अर्जुन पाटील, अनिल भोळे, ऋतेश निकम, सरपंच गोविंद पवार, समाधान चिंचोरे, विजय आमले, व्यवस्थापक व्ही.पी. पाटील,दिपक पाटील, सेवानिवृत्त डीएमओ एस. पी. माळी, अनिल पाटील, यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविकात अण्णासाहेब साहेबराव पाटील फ्रुट असेल सोसायटीचे संचालक रमेशअप्पा पाटील यांनी भरडधान्य खरेदीबाबत उद्दिष्ट वाढीची मागणी केली. आभार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक पाटील यांनी मानले.
दरम्यान, तालुक्यातील म्हसावद येथेही ना. गुलाबराव पाटील यांनी काटा पूजन करून याचे उदघाटन केले. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २० लाख रूपयांची एक अद्ययावत रूग्णवाहिका देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तर राज्य सरकार हे शेतकर्यांच्या पाठीशी उभे असून शासकीय भरड धान्य खरेदीच्या माध्यमातून कृषी उत्पादनास योग्य भाव मिळणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तर यंदा देखील सीसीआयच्या माध्यमातून शेतकर्यांच्या कपाशीला चांगला भाव मिळणार असल्याची ग्वाही दिली.