जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दूध संघातील नवनियुक्त प्रशासक मंडळाने झाडाझडती सुरू करत एमडीचा कार्यभार दुसर्यांकडे सोपवितांनाच अतिरिक्त कर्मचार्यांना घरी पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.
जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील प्रशासक मंडळाने याचा कार्यभार सांभाळला आहे. यातील वाद न्यायालयात गेल्यानंतर हायकोर्टाने जैसे थे असा निर्णय दिला आहे. तर विभागीय सहकार उपनिबंधक (दुग्ध) यांनी प्रशासक मंडळाला अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने दोन दिवसांपासून मुख्य प्रशासक आ. मंगेश चव्हाण यांच्यासह त्यांचे सहकारी हे सकाळपासून संस्थेत ठाण मांडून बसत असल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी प्रशासक मंडळाने कार्यकारी संचालक मनोज लिमये यांचा कार्यभार शैलेश बोरखेडे यांच्याकडे दिला. तर दूध संघात अतिरिक्त कर्मचारी असल्याची ओरड लक्षात घेऊन येथे आवश्यकतेच्या पेक्षा अधिक कर्मचारी आढळून आल्यास त्यांना घरी पाठविण्याची तयारी देखील करण्यात आली असून याबाबत येत्या काही दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच प्रशासक मंडळाने दूध संघाचे कामकाज जाणून घेत याची झाडाझडती सुरू केली आहे.