रावेर (प्रतिनिधी)। जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन मतदारसंघांपैकी एक जागी शिवसेनेला हवी असून त्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घेण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांपैकी कोणता मतदारसंघ कोणाला मिळणार ते आधी निश्चित करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी ‘लाईव्ह ट्रेन्डस न्यूज’शी बोलताना केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली असून युवा महिला ज्येष्ठ नागरीक दोन्ही मतदारसंघात शिवसेनेशी जुळत असल्याने सेनेला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रावेर व जळगाव पैकी एक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही मागणी केली असून लवकरच याचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात भाजप-सेनेची युती होऊन आठवडा उलटला तरी सुद्धा भाजपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे शेवटी पाटील यांनी सांगितले. युती झाली खरी परंतु अजुन सुध्दा भाजपा शिवसेनेतील स्थानिक पदाधिका-यांची मने दुभंगली आहेत, युती होऊन आठवडा उलटला तरी अजून स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेचे संयुक्त बैठक झालेली नाही. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असताना अजून भाजपा आणि शिवसेनेत मनोमिलन झाले नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. असेही ते यावेळी म्हणाले.